अणू शक्तीमान


 

शक्तिमान अणू


     अणू म्हणजे काय हे सोप्या  व रंजक भाषेत आणि चित्ररुपातून समजावून सांगितलंय विज्ञान अभ्यासक संजय पाठक यांनी , नुकत्याच प्रकाशित झालेल्या त्यांच्या 'शक्तिमान अणू' या पुस्तिकेतून.   

मुलांसह सर्वांनाच अणूविषयी  कमालीचं कुतूहल वाटत असतं. नेमकी हीच गोष्ट लक्षात घेऊन लेखक संजय पाठक यांनी 'शक्तिमान अणू ' ही पुस्तिका अनुवादित स्वरूपात लिहिली आहे.अणूची रचना सोप्या इंग्रजी भाषेतून स्पष्ट करणारी एक चित्रमय पुस्तिका भारत सरकारच्या न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या पर्यावरण आणि जनसंपर्क संचालनालयाने काही वर्षांपूर्वी प्रकाशित केली होती.न्यूक्लिअर पाॅवर कार्पोरेशनच्या त्या पुस्तिकेचं अनुवादित रूप म्हणजे संजय पाठक यांची 'शक्तिमान अणू' ही पुस्तिका होय. 

        अणूविषयी सर्वांनाच कुतूहल असतं.अणू हा मूलद्रव्याचा घटक आहे.ॲटोमोस या ग्रीक भाषेतील शब्दाचा अर्थ आहे 'अविभाज्य '. ॲटोमोसपासून बनला ॲटम हा शब्द. ॲटम म्हणजेच अणू. 

अणूच्या अंतरंगात जाण्यापूर्वी लेखक आपल्याला अणूच्या शोधाविषयीची माहिती थोडक्यात सांगतात.इसवी सन पूर्व सहाव्या शतकाच्याही अगोदर होऊन गेलेल्या महर्षी कणाद या भारतीय तत्वज्ञांनी त्यांच्या 'वैशेषिक सूत्र ' या ग्रंथात, ' जगातील सर्व पदार्थ हे अणूंचे बनलेले असतात 'असे सांगितले आहे.त्यानंतर अणूचे घटक ,त्यांची रचना,किरणोत्सार , केंद्रकीय संमीलन आणि विखंडन, अणुऊर्जा,अणुभट्टीचं कार्य याविषयीची महत्त्वाची माहिती देत देत लेखक वाचकांचं अणूबद्दलचं कुतूहल आणखी जागं करतात.

      ठाणे येथील व्यास क्रिएशन्स् ने प्रकाशित केलेली ही चित्रमय पुस्तिका सर्व स्तरातील वाचकांमध्ये अणूविषयीची उत्सुकता जागी करण्यात आणि ती पूर्ण करण्यात  यशस्वी ठरली आहे.प्रत्येक पानावर मजकूरासोबत आकर्षक चित्रांचा प्रवास पुस्तकाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत  आहे. त्यामुळे अणूची ही  चित्रमय कथा वाचकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवते.पुस्तक वाचून झाल्यावर, 'अरे , यालाच म्हणतात होय अणू !' असं समाधानयुक्त स्मित वाचकाच्या चेहऱ्यावर झळकतं.

          पुस्तक जरी अनुवादित असलं तरी अणूबद्दलचं वाचकांचं कुतूहल शमवण्याचा प्रामाणिक प्रयत्न लेखकाने केला आहे.विज्ञानाविषयी जाणून घेऊन वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याचा तसेच जीवनमुल्यांची जोपासना करण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्न लेखकाने या पुस्तिकेतून केल्याचं दिसतं.

       मुंबईतलं अणूशक्तीनगर, तेथील विजय,आनंद,अमर,भारत,चित्रा आणि दीपा ही सहा मुलं व डॉ.अनुराग ऊर्फ अनुकाका यांभोवती ही चित्रमय कथा फिरते.सुरूवात प्राचीन ग्रंथातील गायत्री मंत्रापासून होते.इथेच अनुकाका मुलांना भारतीय प्राचीन ग्रंथांनी आणि ऋषीमुनींनी आधुनिक विज्ञानातल्या अनेक गोष्टी पूर्वीच सांगितल्या आहेत हे स्पष्ट करतात.अणूची ही चित्रमय कथा मग पुढे सरकत जाते.गंमतीशीर अशा लहान लहान कृती त्या सहा मुलांकडून करवून घेत आणि त्यांना छोटी छोटी उदाहरणं देत अनुकाका अणूची संकल्पना त्या मुलांना समजावून सांगतात.त्याचवेळेस वाचकही त्या कृती प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे करण्यास उद्युक्त होतो. शास्त्रज्ञ कसे असतात याचेही गंमतीशीर उदाहरण या पुस्तिकेत आहे. 'अरेच्चा,असंही असतं' असं उत्तर मिळाल्यावर अणू सारखा क्लिष्ट विषयही आपल्याला आवडू लागतो! आणि त्यातून विज्ञान आपल्याला  जवळचं वाटू लागतं.हीच या पुस्तकाची खरी ताकद आहे.

    जॉन डाल्टन,जे.जे.थॉमसन,अर्नेस्ट रुदरफोर्ड,नील्स बोर यांनी केलेल्या अणूच्या संशोधनाबद्दलची माहिती अगदी सोप्या भाषेत अनुकाका त्या सहा मुलांना देतात.तर अणूत असलेल्या प्रोटॉन,न्यूट्रॉन,इलेक्ट्रॉन या  घटकांची ओळख डाळींसारख्या दैनंदिन जीवनात आढळणाऱ्या पदार्थांच्या साहाय्याने अनुकाका त्या मुलांना करून देतात ! 

       पुस्तकाचा सर्व प्रवास चित्रमय व  संवादरूपी असल्याने, 'पुढे काय? पुढे काय?' अशी उत्सुकता वाचकांना लागून राहते.अणूसंबंधीचं प्रदर्शन पाहण्यासाठी त्या मुलांनी अनुकाकांसह गाडीतून केलेला प्रवास, प्रदर्शनाच्या ठिकाणचे संवाद आपलं कुतूहल ताणतात.अणू प्रदर्शन पहात असताना,ती सहा मुले आणि अनुकाका यांच्यामध्ये झालेले संवाद  सहज शिक्षण कसं असतं हेच आपल्याला सांगतात.मुलांना पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नांचं आणि आपल्यालाही पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक समाधान अनुकाका करतात.

      कोणत्याही वयातील वाचकांना, विशेषतः ज्यांना विज्ञान विषयाची आवड आहे अशा सर्व वाचकांना हे चित्रमय पुस्तिका नक्कीच आकर्षित  करते.पुस्तिकेचं मुखपृष्ठ अतिशय आकर्षक व बोलकं आहे. ही पुस्तिका विज्ञान विषयावरचीच आहे ही गोष्ट पुस्तिकेचं मुखपृष्ठ पाहिल्याबरोबर वाचकाच्या लक्षात येते.मूळ इंग्रजी भाषेत असलेल्या पुस्तिकेचा अनुवाद  संजय पाठक यांनी अगदी सोप्या मराठीत केला आहे. त्यामुळे ही पुस्तिका मुलांमध्ये  विज्ञानाची आवड  निर्माण करेल हे नक्की! 


शक्तिमान अणू

लेखक : संजय पाठक

प्रकाशक - व्यास क्रिएशन्स, ठाणे (प.)४०० ६०२

संपर्क :(०२२)२५४४७०३८

मूल्य : रु.६०/-


- भरत पाटील

9665911657

Comments